JiSwa Enterprises

महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय भक्तिसंप्रदाय. 'वारी करणारा' ह्या अर्थाने 'वारकरी' हा शब्द वापरण्यात आलेला आहे. 'वारी' ह्या शव्दाचा अर्थ यात्रा, नियमित फेरी, व्रत, येरझार असा दिला जातो, हे लक्षात घेतल्यास आपल्या उपास्य देवतेच्या-मग ती कोणतीही असो-यात्रेला जो नियमितपणे, एक व्रत म्हणून जातो, तो 'वारकरी' असे म्हणता येईल. 
वारकरी संप्रदायाला 'माळकरी संप्रदाय' असेही एक पर्यायी नाव आहे. प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीच्या १०८ मण्यांची माळ असते. इतर अनेक धर्मपंथांत माळेला स्मरणी म्हणून महत्त्व आहेच; पण वारकरी संप्रदायात ही तुळशीच्या मण्यांची माळ घातल्याखेरीज कोणाला वारकरी होताच येत नाही. माळ घालणे, म्हणजे एक नवा आध्यात्मिक जन्म घेणे, असे मानले जाते. वारकरी संप्रदायात माळ म्हणजे निव्वल स्मरणी नव्हे.
पंढरपूरचा विठोबा हे वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत असल्यामुळे वारकऱ्यांचे मुख्य क्षेत्र पंढरपूर आणि तीर्थ चंद्रभागा होय. विठोबा हे श्रीकृष्णाचेच रूप आहे, अशी सर्व संतांची धारणा असल्यामुळे वारकरी संप्रदाय हा कृष्णोपासकही आहेच. तथापि तो रामाचाही उपासक आहे.