गुरुवंदन
Автор: ज्ञान प्रबोधिनी / Jnana Prabodhini
Загружено: 2023-08-23
Просмотров: 8934
गुरुवंदन
स्वीकारुनि ही नमने सुमने आशीर्वच द्यावा
नमाेऽस्तु ते गुरुदेवा ।।ध्रु.।।
आलाे तेव्हा अनुभव हाेता मायपित्यांच्या वत्सलतेचा
परंतु तुमच्या परिसस्पर्शे ज्ञानचक्षु उघडला
परंपरेचा संस्कारांचा सहज लाभला ठेवा ।।१।।
सांगुन शिकवुन कधि उपदेशुन, विमल सुचरितातुनी दाखवुन
अज्ञानातुन अज्ञाताच्या जवळ घेउनी गेला
ऋषिकुल-प्रतिनिधी ! कृतज्ञतेचा प्रणाम हा घ्यावा ।।२।।
आजवरी अतिपरिचय हाेउन, तुम्हास प्रियमित्रासम मानुन
कधी अवज्ञा कधी अनादर अजाणतेपणि घडला
क्षमस्व गुरुवर ! क्षमा असावी मनात राग नसावा ।।३।।
तुमचे हे व्रत पुढे चालवू निरलस श्रमुनी सुयश मेळवू
तुमच्या कर्मरतीतुन अमुच्या मनि आहे रुजला
‘कर्मातच ज्ञानाचे सार्थक’ हा तुमचा सांगावा ।।४।।
तुमच्या इच्छा अमुची स्फूर्ती तुमची स्वप्ने अमुच्या ज्याेती
बळ अमुच्या पंखांतुन वाहे ती तुमची माया
त्या मायेची ऊब लाभुनी तेज मिळे सद्भावा ।।५।।
गुरुतेचे आकर्षण भेदुन नीलनभी लीलेने विहरुन
स्वर्गंगेतील कमळे खुडुनी नटवू भारतभूला
त्यासाठी आचार्य ! आम्हांला आशीर्वाद हवा ।।६।।
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: