Manikgad Fort
Автор: सह्याद्रीच्या गडवाटा
Загружено: 2024-02-13
Просмотров: 1817
पायथ्याच्या वडगावातून गावाच्या मागील डोंगराआडून डोकावणारा माणिकगडाचा माथा दिसतो. परंतु तेथे पोहोचण्यासाठी माणसाला द्राविडी प्राणायाम करावा लागतो. प्रथम गावामागचा डोंगर चढून गेल्यावर माणूस ठाकरवाडीत पोहोचतो. ठाकरवाडीतून लांबलचक पठार पार करून किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचता येते. तेथून दाट झाडीतील खड्या चढणीची वाट चढून किल्ल्याला पूर्ण वळसा घालून किल्ल्याच्या वडगावातून दिसणाऱ्या बाजूच्या विरुद्ध बाजूस येता येते. येथून किल्ल्याची तटबंदी व बुरुज दिसायला लागतात. येथे सपाटीवर पाण्याचे एक टाके आहे. त्याच्या बाजूने पुढे जाऊन थोडे चढून गेल्यावर पूर्वेकडून तुटलेल्या तटबंदीतून गडावर प्रवेश होतो. किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच चुन्याचा घाण्यासाठी कातळात कोरलेला चर दिसतो. पूर्वी या ठिकाणी घाण्याचे दगडी चाक होते. आता ते गडावर दिसत नाही. चुन्याच्या घाण्याजवळच त्याची छोटी प्रतिकृती कोरलेली आहे. चुन्याच्या घाण्याजवळून दोन वाटांनी किल्ला पाहाता येतो. सरळ चालत गेल्यास माणूस उत्तराभिमुख प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. गडाचा दरवाजा, पाहारेकऱ्यांसाठी असणाऱ्यां देवड्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. दरवाजाच्या आतल्या बाजूस घुमटी आहे. त्यात एक शेंदूर फ़ासलेली मूर्ती ठेवलेली आहे.
गडाच्या मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूस गडाचा दुसरा दक्षिणाभिमुख दरवाजा आहे. या दरवाजाची चौकट अजून शाबूत आहे. द्वारपट्टीवर गणपती कोरलेला आहे. दरवाजा ओलांडून आत गेल्यावर गडाचा सर्वोच्च माथा येतो. येथे उजव्या बाजूस मोठ्या वास्तुचे अवशेष आहेत. त्याच्या पुढे गडावरील सर्वात मोठे टाके आहे. ते पाहून दरी उजवीकडे ठेवत पुढे गेल्यावर खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. त्या उतरून गेल्यावर गडाच्या उत्तर टोकावरील उद्ध्वस्त बुरुजावर आपण पोहोचतो. येथुन उजवीकडे वळून (दरी डाव्या बाजूस ठेवून) चालत गेल्यास प्रथम उध्वस्त चोर दरवाजा दिसतो. पुढे गेल्यावर उजव्या बाजूस पाण्याची २ बुजलेली टाकी आहेत. त्याच्या पुढे खोलगट भागात उघड्यावर शंकराची पिंड आणि नंदी आहे. तेथेच एक शेंदूर फ़ासलेली भग्न मूर्ती आहे. त्यापुढे रांगेत चार टाकी आहेत. त्यातील छोट्या टाक्यातील पाणी पिण्यालायक आहे. याशिवाय या टाक्यांसमोरच दरीच्या बाजूस एक शेंदूर फ़ासलेला दगड दिसतो तेथे दरीच्या खालच्या अंगाला एक टाके आहे.
टाके पाहून पुढे गेल्यावर पूर्व टोकावरील बुरुज लागतो. या बुरुजाच्या बाजूला असलेल्या तुटक्या तटबंदितूनही गडावर येता येते. परंतु त्यासाठी कातळ टप्पा व घसाऱ्याची वाट चढून जावे लागते. पावसाळ्यात या मार्गाने येणे टाळतात. बुरुजावरून तटबंदीच्या बाजूने चालत जातांना ही तटबंदी अनेक ठिकाणी तुटलेली दिसते. पुढे गडाच्या सर्वोच्च माथ्यावरच्या बुरुज लागतो. गडावरील सुस्थितीत असलेल्या या बुरुजाला चर्याही आहेत. या बुरुजाच्या पुढे पायऱ्या आहेत. या ठिकाणी उद्ध्वस्त दरवाजाचे अवशेष आहेत. गडाच्या आतील भागात असलेले या दोन दरवाजे पाहून असे अनुमान काढता येते की गडाच्या सर्वोच्च माथ्याला तटबंदी होती. या दरवाजातून खाली उतरल्यावर पुन्हा गड जिथून पाहायाला सुरुवात केली त्या जागेपाशी माणूस येऊन पोहचतो. किल्ल्यावरून उत्तरेला प्रबळगड, इरशाळगड, माथेरान, वायव्येला कर्नाळा आणि ईशान्येला सांकशीचा किल्ला हा परिसर दिसतो. संपूर्ण गडफेरीस अर्धा तास पुरतो.
#ManikgadFort
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: