ग्रीनफिल्ड मार्ग वाढवण बंदर प्रकल्पावर पुन्हा एकदा वादाचे सावट ग्रामस्थांचा तीव्र विरोध
Автор: आपली NEWS
Загружено: 2025-12-15
Просмотров: 8973
ग्रीनफिल्ड मार्ग वाढवण बंदर प्रकल्पावर पुन्हा एकदा वादाचे सावट ग्रामस्थांचा तीव्र विरोध
वाढवण बंदर प्रकल्पासाठी खाजगी जमिनींतून अनधिकृत रस्त्याचे काम?
झाडतोड व खोदकामावरून ग्रामस्थ संतप्त, प्रशासनाकडे चौकशीची मागणी
वाढवण (ता. डहाणू) : प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाअंतर्गत खाजगी जमिनींमधून कोणतीही अधिकृत परवानगी नसताना रस्त्याचे काम सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित जमिनींचे डीमार्केशन पूर्ण झाल्यानंतर त्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे बांधकाम, झाडतोड अथवा खोदकाम करण्यास कायदेशीर मनाई असतानाही आयटीडी कंपनीकडून सर्रास रस्त्याचे काम सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही खाजगी व्यक्ती तसेच एका खासगी कंपनीने आयटीडी कंपनीसोबत रस्त्यासाठी भाडेकरार केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, वाढवण बंदर प्रकल्पाला ग्रामस्थांनी ठामपणे विरोध दर्शवलेला असताना अशा प्रकारे भाडेकरार करून रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केल्याने गावात तीव्र संतापाची भावना पसरली आहे.
डीमार्केशन झालेल्या जमिनीत झाडतोड?
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रस्ता बांधण्यासाठी विविध प्रकारची झाडे तोडण्यात येत असून जमिनीची मोठ्या प्रमाणावर खोदाई सुरू आहे. डीमार्केशन झालेल्या जमिनीत जमीनमालकालाही कोणतेही काम करता येत नाही, असे कायदे स्पष्ट असताना कंपनीकडून सुरू असलेले हे काम नेमके कोणाच्या परवानगीने सुरू आहे, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची कायदेशीरता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
रोजंदारी, पार्टी आणि कामगार भरतीचे आरोप
काही ग्रामस्थांनी आरोप केला आहे की, या रस्त्याच्या कामासाठी स्थानिकांना दररोज सुमारे ६०० रुपये रोजंदारी देऊन, महिन्याला अंदाजे १८ हजार रुपयांचे आमिष दाखवले जात आहे. यासोबतच दारू आणि चिकन पार्टी देऊन लोकांना कामासाठी तयार केले जात असल्याचेही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकारामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
शेतकऱ्यांचे वेगळे म्हणणे
दरम्यान, काही स्थानिक शेतकऱ्यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. त्यांच्या मते, शेतामध्ये माहिती संकलनाचे (सर्वेक्षणाचे) काम सुरू असून त्या कामासाठी पाण्याची आवश्यकता असल्याने बोरवेलच्या गाड्या ये-जा करू शकाव्यात यासाठी हा रस्ता तात्पुरत्या स्वरूपात खुला करून देण्यात आला आहे. मात्र, हा दावा कितपत अधिकृत आहे, याबाबत कोणतीही लेखी परवानगी समोर आलेली नाही.
प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी
या संपूर्ण प्रकाराची तात्काळ चौकशी करून अनधिकृत झाडतोड आणि रस्त्याचे सुरू असलेले काम त्वरित थांबवावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा वाढवण बंदर प्रकल्पाविरोधातील स्थानिकांचा संघर्ष अधिक तीव्र होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
प्रशासन या प्रकरणावर नेमकी कोणती भूमिका घेते, तसेच आयटीडी कंपनीकडून याबाबत काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: