Me Alladiya Khan | Manogat | Dr. Ashwini Bhide Deshpande | Batiyan Daurawat | Announcement
Автор: Ashwini Bhide Deshpande
Загружено: 2025-08-08
Просмотров: 10427
नमस्ते, आज 'बतियां दौरावत'चा हा भाग एका खास घोषणेसाठी!
ख्याल गायनाच्या क्षेत्रात ज्या 'जयपूर अत्रौली' घराण्याचं प्रतिनिधित्व करीत मी गेली चार दशकं मार्गक्रमणा केली, त्या माझ्या प्रिय घराण्याचे संस्थापक, माझे सांगीतिक पूर्वज, संगीताचे गौरीशंकर, गायनमहर्षि मरहूम उ. अल्लादियाखांसाहेब यांचं मी लिहिलेलं ललितचरित्र लवकरच प्रसिद्ध होत आहे. या पुस्तकात खांसाहेबांची कादंबरीसारखी रंजक, रोचक जीवनकहाणी गोष्टरूपाने सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. हे करण्यामागे माझी भूमिका काय होती, ते सांगण्याचा खटाटोप मी आजच्या भागात करणार आहे. पुस्तकात मी लिहिलेल्या 'मनोभूमिके’चा काही भाग मी आज इथे मांडणार आहे.
खांसाहेबांच्या जीवनचरित्रातल्या रंजक नि रोचक हकीकती वाचता वाचता न् कहाण्या ऐकता ऐकता त्यांच्या गायकीबद्दल आणि ती गायकी ज्या त्यांच्या जीवनानुभवांतून सिध्द झाली त्या जीवनचरित्राबद्दल कल्पनेनं चित्र रंगवण्याचा मला नाद लागला. तसं पहायला गेलं, तर खांसाहेबांचे निकटवर्तीय असलेले, त्यांना पंचवीस वर्षं जवळून ओळखणारे, आणि त्यांच्या पायी निष्ठा ठेवलेले संगीतमर्मज्ञ गोविंदराव टेंबे यांनी खांसाहेबांचं सुंदर चरित्र लिहिलं आहे. स्वतः खांसाहेबांनी त्यांच्या जीवनाच्या अखेरच्या तीनचार वर्षात स्वतःच्या बालपणीच्या आठवणी, आणि त्यांच्या संगीतप्रवासातल्या महत्त्वाच्या टप्प्यांबद्दल प्रकट केलेले विचार त्यांचे नातू बाबा (जे त्यावेळी २०-२२ वर्षाचे होते) यांनी ऊर्दूत लिहून घेतले होते. हे स्मरणरंजनही आता - त्याच्या इंग्रजी अनुवादाच्या रूपात, ‘My Life’ या नावाने रसिकांसाठी उपलब्ध आहे.
एवढं सगळं साहित्य उपलब्ध असताना, मी पुन्हा एकदा खांसाहेबांचं ललित चरित्र लिहायचा प्रयत्न करते आहे. तेदेखील, "मी... अल्लादियाखां" अशा प्रथमपुरुषी एकवचनी स्वरूपात! का बरं?
ह्या प्रश्नाचं उत्तर मला सहजपणे देता येत नाही. ती जीवनकहाणी ललित, रंजक, गोष्टरुपाने सांगण्याचा मोह मला आवरता आला नाही.
पण त्यांच्या आयुष्यात त्यांच्या वाट्याला आलेले अनुभव हे इतके कल्पनाविलासाला आमंत्रण देणारे होते, की मी त्यांच्या भूमिकेत स्वतःला योजून त्या कल्पनाविलासात अगदी रंगून जात होते.... खांसाहेबांना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलं, ऐकलं त्यांनी खांसाहेबांबद्दल लिहिलेले लेख, आठवणी यांच्या वाचनातून, आणि गुरु शिष्य परंपरेतून माझ्यापर्यंत पोचलेल्या खांसाहेबांच्या संगीत संस्कारांच्या आधाराने मी खांसाहेबांच्या संबंधातल्या दंतकथा समजून घ्यायचा प्रयत्न केला. आयुष्यातल्या एखाद्या घडामोडीसंदर्भात खांसाहेबांनी जी भूमिका घेतली, ती तशी का घेतली असावी याचा शोध मी घेत गेले, आणि ‘कदाचित असं झालं असावं’ असं मला वाटलं, पटलं, ते मी मांडत गेले.
बाकी या चरित्रातलं 'जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते' सारं खांसाहेबांचं आहे या विनम्र जाणिवेसरशी इथे थांबते. हे देणं खांसाहेबांचंच आहे, ते त्यांनाच अर्घ्यरूपाने अर्पण करते.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: